पुणे: कार्तिकी एकादशीच्या (Pune Accident) वारीसाठी निघालेल्या (Pune News) वारकऱ्यांच्या दिंडीत आज सकाळी मोठा अपघात झाला. भरधाव कंटेनरने थेट दिंडीत घुसून एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास कामशेत घाटात घडली. मृत महिला वारकऱ्याचे नाव प्रियांका तांडेल (वय 55, रा. उरण) असे असून ती श्री दावजी पाटील दिंडीसोबत वारीसाठी आळंदीच्या दिशेने जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण येथून आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी ही दिंडी पायी प्रवास करत होती. कामशेत घाटातून दिंडी जात असताना एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट वारकऱ्यांच्या रांगेत शिरला. अचानक झालेल्या या भीषण घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. वारकऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि काहींनी कंटेनरच्या बाजूला पळ काढला, परंतु काहीजणांना त्याने धडक दिली.
या अपघातात प्रियांका तांडेल यांचा जागीच मृत्यू झाला असून आठ वारकरी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हा अपघात जुना पुणे–मुंबई महामार्गावर घडला असून घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर रस्त्यावर अडकल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.
वारकऱ्यांच्या दिंडीत असा अपघात होणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. वारकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे वाहतुकीसाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, सकाळच्या वेळी झालेल्या या अपघाताने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढील उपाययोजना करण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने दिले आहे.







