प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune : पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट-३ यांनी अपहरण करून खून केलेल्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश चिंचू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर), नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) तसेच दोन विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे.
१७ वर्षीय अमन सुरेंद्रसिंग गचंड याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यांचे साथीदार पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
अमन गचंड हा दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी घरातून बाहेर पडून बेपत्ता झाला होता. त्यानंतर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी त्याची आई अनिता गचंड यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना दि. ०९ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, तपासादरम्यान आरोपी कर्नाटकातील बेळगाव येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून त्यांना अटक करण्यात आली.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून आरोपींनी अमन गचंड याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.







