Pune : कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवित असताना सहाव्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील जिन्यांना सुरक्षेसाठी कठडे नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत मुलाचे नाव श्लोक नितीन बांदल (वय 12 रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे आहे. याप्रकरणी श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय-35, रा. ओैंदुबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या शेजारील सोसायटीत बांदल कुटुंब वास्तव्यास आहे. श्लोक इयत्ता पाचवीत शिकत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कार्यरत आहेत. गुरुवारी (ता. 8) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजता श्लोक पतंग उडविण्यासाठी जवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेला. यावेळी सहाव्या मजल्यावर तोल गेल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीत इमारतीचे काम सुरू असून जिन्यांना कोणतेही संरक्षक कठडे नसल्याचे निष्पन्न झाले. बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करत आहेत.





