पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून (Pimpri Crime) एका घटस्फोटीत महिलेशी (Pune News) फसवणूक करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. विवाहित असूनही अविवाहित असल्याचे खोटे सांगत विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावर महिलांची फसवणूक करणारा हा आरोपी जयपूर येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आलोक अजयकुमार पुरोहित (वय 43, रा. शास्त्रीनगर, जयपूर) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील पीडित महिलेनं 27 सप्टेंबर 2025 रोजी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी ही घटस्फोटीत महिला असून, विवाह जुळविण्याच्या एका संकेतस्थळावर आलोक पुरोहित याची तिची ओळख झाली. आलोकनं स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगत तिच्याशी नियमित संपर्क साधला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो पुण्यात आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
यानंतर आलोकनं पीडितेची अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ तयार करून तिला ‘ब्लॅकमेल’ करणं सुरु केलं. त्याने तिला धमकी दिली की, जर तिने पोलिसांकडे तक्रार केली तर तिची ही छायाचित्रे व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले जातील. त्यामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. शेवटी तिनं धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहित असल्याचे समोर आले. त्याने आपल्या वैवाहिक स्थितीची माहिती लपवून वेगवेगळ्या विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळांवर खोट्या नावाने नोंदणी केली होती. या माध्यमातून तो महिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास जिंकत असे आणि नंतर आर्थिक तसेच शारीरिक शोषण करत असे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर महिलांनाही त्याने अशाच प्रकारे फसवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वाकड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना आलोक पुरोहितचा मागोवा घेत दिल्लीत धाड टाकली आणि त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.







