पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी (Pune News) (कार्तिकी यात्रा) आळंदीमध्ये जमणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी परिसरात असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी थेट पिण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेमुळे नदीच्या पात्रातील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्यामुळे, हे पाणी पिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत नदीचे पाणी वापरतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी नदीच्या दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
कार्तिकी यात्रे बाहेरून आलेल्या भाविकांनी आळंदीतील सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करावा. दरम्यान, नदीचे पाणी इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरण्यास परवानगी आहे. परंतु नदीत कपडे धुणे किंवा नदीचे पाणी खराब होईल असे कोणतेही काम करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.







