पुणे: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News) शहरात प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येमुळे थेरगाव परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा तिच्याच प्रियकराने गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला पेट्रोलने जाळण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आला. राणी 26 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तांत्रिक तपासात राणी आणि अनिकेत यांच्या सततच्या संभाषणातून पोलीस अनिकेतपर्यंत पोहोचले. तो बार्शी-लातूर भागातून परतल्यानंतर ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबूल दिली.

राणी विशाल गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी प्रियकर अनिकेत महादेव कांबळे याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
राणी आणि अनिकेत हे दोघेही विवाहबाह्य संबंधात होते त्यांना मुले आहेत. गेल्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. राणीने पती आणि मुलांना सोडून अनिकेतसोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. अनिकेतने या त्रासातून कायमची सुटका मिळवण्यासाठी राणीने थंड डोक्याने कट रचला.
अनिकेतने ‘गावी घेऊन जातो’ असे सांगून राणीला कारमध्ये बसवून शहराबाहेर नेले. प्रवासात त्याने राणीची हत्या केली. डोक्यावर लोखंडी पाईपने वार करून तिचा खून करून गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह लातूर-बार्शी हायवेवरील ढोकी गावाजवळ नेऊन पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिसांनी आरोपी अनिकेत कांबळेवर हत्या आणि पुरावा नष्ट करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.







