पुणे: पुण्याच्या लखलखत्या दुनियेमागे (Pune News) एक काळोखी बाजू दडली आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना रावेत-पुनावळे परिसरात घडली आहे. नैराश्यातून एका 25 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. वैभव सुतार असे तरुणाचे नाव आहे.

वैभव हा सुशिक्षित तरुण असून त्याने बी.बी.ए. (BBA) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. गुरुवारी मध्यरात्री तो पुनावळे येथील ‘पेटकर सियोना’ या सोसायटीत आपल्या मित्राला भेटायला गेला होता. रात्री अडीचच्या सुमारास मित्रांसोबत जेवण आटोपल्यानंतर वैभव फ्लॅटच्या बाहेर आला. कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने पॅसेजच्या भिंतीवरून थेट खाली उडी मारली. 24 व्या मजल्यावरून खाली उडी मारल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वैभव आपल्या आई-वडिलांना तो एका मोठ्या आयटी कंपनीत उच्च पदावर कामाला असल्याचे सांगत होता. प्रत्यक्षात मात्र, त्याला आयटी क्षेत्रात नोकरी मिळालीच नव्हती. तो आपल्या एका मित्राच्या पोल्ट्री व्यवसायात त्याला मदत करत होता. याच गोष्टीमुळे त्याला नैराश्य आले होते. दरम्यान, अखेर तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासून समोर येत आहे.







