पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pune News) आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वच पक्ष सोयीनुसार युतीची जुळवाजुळव करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गट सोबत येऊन लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संभाव्य युतीबद्दल विचारले असता, अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “मला पुण्यात स्थानिक आमदार, शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवकांनी भेटून युतीबद्दल त्यांचे मत मांडले. याबाबत दोन दिवसांनी मी पुन्हा पुण्यात येऊन याबाबत अंतिम चर्चा करेन. मात्र, दोन्ही गटांना एकत्र आणण्याबाबत आपले शरद पवार यांच्याशी कोणतेही थेट बोलणे झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये युतीची चर्चा:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. याबाबत अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट काय निर्णय घेणार आणि याचा निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







