Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील राजकीय आणि वैयक्तिक वाद पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा हा नवा अध्याय असून, याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pimpri Chinchwad)

भाजपच्या माजी आमदार आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावर केलेल्या तीव्र टीकेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार शंकर जगताप यांनी प्रभाग क्रमांक 31 मधून दिलेले उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांना उद्देशून त्यांनी “निष्ठा की विश्वासघात?” असा सवाल उपस्थित केला. माऊली जगताप यांनी उमेदवारीनंतर सोशल मीडियावर “15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं” असा भावनिक पोस्ट टाकला होता. हाच पोस्ट अश्विनी जगताप यांच्या रोषाचे कारण ठरला.
अश्विनी जगताप यांचा आरोप आहे की, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय छत्रछायेखाली वाढलेल्या माऊली जगताप यांनी त्यांच्याच जागी स्वतःला पाहण्याचे मनसुबे वर्षानुवर्षे रचले. त्यांनी या वागणुकीला थेट “नमकहरामी” असे संबोधत, अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्या शंकर जगताप यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
या वादामागे जुनी पार्श्वभूमी आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून दीर-वाहिनींमध्ये वारंवार मतभेद झाले. चिंचवड पोटनिवडणूक आणि 2024 विधानसभा निवडणुकीदरम्यानही हे मतभेद उफाळून आले होते. शंकर जगताप आमदार झाल्यानंतर हे वाद शमल्याचे चित्र होते, मात्र माऊली जगताप यांच्या उमेदवारीने पुन्हा ठिणगी पडली.

विशेष म्हणजे, माऊली जगताप हे मूळचे प्रभाग क्रमांक 29 मधील रहिवासी असून, त्यांना 31 मधून उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. “आयात उमेदवार नको” अशी मोहीमही राबवण्यात आली होती.
मतदानाच्या तोंडावर अश्विनी जगताप यांनी केलेल्या या भावनिक आणि आक्रमक पोस्टमुळे दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा वाद केवळ कौटुंबिक नसून, भाजपच्या स्थानिक राजकारणातील फूट स्पष्टपणे दाखवणारा ठरतो. त्यामुळे याचा थेट परिणाम मतदारांच्या निर्णयावर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





