पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका 34 वर्षीय उच्चशिक्षित महिलेला तिच्याच पतीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःच्या धंद्यात झालेले मोठे नुकसान भरून काढण्यासाठी या व्यक्तीने त्याच्या पत्नीला आर्थिक संकटात ढकलले. जून 2023 पासून ते 20 डिसेंबर 2025 या अडीच वर्षांच्या काळात पिंपळे निलख परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आता सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सुरुवातीला आरोपीने पत्नीला गोड बोलून तिच्या पगाराचे सर्व पैसे स्वतःच्या व्यवसायामध्ये वापरले. त्यानंतर धंद्यात तोटा झाल्याचे सांगून त्याने पत्नीच्या नावाने 58 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज काढायला लावले. मात्र पती एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीला कोणतीही कल्पना न देता तिची बनावट सही केली आणि खोटी कागदपत्रे तयार करून विविध बँकांकडून 17 लाख 64 हजार रुपयांचे कर्ज परस्पर उचलले. पगार आणि विविध मार्गाने काढलेले कर्ज मिळून पतीने पत्नीची एकूण 1 कोटी 40 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या नावावर इतके मोठे कर्ज असल्याचे जेव्हा महिलेला समजले, तेव्हा तिला धक्काच बसला. दरम्यान, फसवणूक केल्याबद्दल पोलिसांनी आता पतीवर गुन्हा दाखल केला असून या फसवणुकीच्या कामात बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याने त्याला मदत केली होती का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.







