पिंपरी-चिंचवड: पिंपरी येथे एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास के.एस.बी चौक चिंचवड या ठिकाणी घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी शेखर भरत जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत घाडगे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील आरोपी प्रशांत घाडगे याने त्याची चारचाकी गाडी पिंपरीतील एका नामांकित सर्विस सेंटरला दुरुस्तीसाठी टाकली होती. मात्र आरोपी घडगे याला गाडीत टाकलेले पेट्रोल आणि बिलामध्ये फेरफार केल्याचा संशय आला. त्यानंतर या संशयातून सर्विस सेंटर मॅनेजर शेखर भरत जाधव यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली.
दरम्यान, प्रशांतने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले त्यानंतर सर्विस सेंटरचा मॅनेजर शेखर जाधव याच्यासोबत भांडण केले. त्यानंतर या वादाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. मॅनेजर शेखर जाधवला प्रशांत घाडगे याने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणाने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.







