पिंपरी-चिंचवड: आळंदी-चऱ्होली रस्ता, (Alandi News) जो वारकरी आणि भाविकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो, त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘साई पॅलेस’ हॉटेलवर मध्यरात्री 2 वाजता टाकलेल्या छाप्यात तब्बल 17 महिलांची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका करण्यात आली असून 6 मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.

आळंदीत गेल्या काही काळापासून शहराच्या बाह्य भागात असलेल्या लॉजिंग-बोर्डिंगच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. आळंदी-चऱ्होली रस्ता हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे लॉजिस्टिक आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच वर्दळीचा फायदा घेत आरोपींनी ‘साई पॅलेस’मध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. गुन्हे शाखेला मिळालेल्या ठोस माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने मोहीम आखली.
गरिबीचा फायदा घेऊन परराज्यातील महिलांना पुण्यात आणले जात होते. आरोपी कृष्णा पाटील, राज मोहन शेट्टी आणि त्यांच्या साथीदारांनी महिलांना कामाचे आणि चांगल्या पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलले होते. या प्रकरणी ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.







