पुणे: कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंडाच्या (Parth Pawar Land Scam Case) गैरव्यवहार प्रकरणात नवे धक्कादायक तपशील (Sheetal Tejwani) समोर आले आहेत. या प्रकरणात (Pune News) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे दोघे भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीचा थेट संबंध उघड झाला आहे. या कंपनीने संबंधित जमीन व्यवहार केला असल्याचे स्पष्ट झाले असून, या संदर्भात सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित शीतल तेजवानीबद्दल आता अधिक गंभीर माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हा 40 एकर भूखंड मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. ही जमीन सरकारी ताब्यातून मुक्त करून तिच्या विक्रीसाठी शीतल तेजवानीने चतुराईने योजना आखली. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपये देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावावर करून घेतली. या अधिकारामुळे ती या व्यवहारात प्रमुख पात्र ठरली.
2025 साली शीतल तेजवानीच्या नजरेस अमेडिया कंपनी पडली आणि तिने या कंपनीतील भागीदारांची माहिती मिळवली. कंपनीमध्ये 99 टक्के भागीदारी पार्थ पवार यांची असून, उर्वरित 1 टक्का भागीदारी दिग्विजय पाटील यांची आहे. हे पाहताच शीतलने मोठा डाव आखला आणि या कंपनीला भूखंड विक्रीसाठी राजी करून गैरव्यवहार घडवला.
शीतल तेजवानीचा भूतकाळही वादग्रस्त राहिला आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी असून त्याच्यावर ईडीने चौकशी केली होती. तथापि, त्या प्रकरणात पुढील कारवाई झाली नाही. या दोघांवर जवळपास 100 कोटी रुपयांचे विविध कर्ज असल्याचे समोर आले आहे. सागर सूर्यवंशीने रेणुका लॉन्सच्या नावावर 1 कोटी 16 लाख आणि 2 कोटी 24 लाख अशी दोन वाहन कर्जे घेतली आहेत. तसेच सागर लॉन्सच्या नावावर 16 कोटी 48 लाखांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले आहे. दुसरीकडे शीतल तेजवानीने स्वतःच्या नावावर 4 कोटी 80 लाखांचे वाहन कर्ज घेतले असून तिच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर 5 कोटी 95 लाखांचे आणि रेणुका लॉन्सच्या नावे 5 कोटी 25 लाखांचे कर्ज आहे.
या सर्व प्रकरणामुळे शीतल आणि सागर यांचे आर्थिक आणि व्यावसायिक कारनामे पुन्हा चर्चेत आले आहेत. सध्या शीतल तेजवानी कुठे आहे किंवा तिचा व्यवसाय कोणता आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र तिची चौकशी झाल्यानंतर अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील व्यवहाराच्या नात्यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







