Muralidhar Mohol : केंद्रीय विमान व नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीभर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे दिली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना किमान 1 महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये तब्बल 29 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्यांना कुस्ती कायमची सोडावी लागली. अनेक वर्षे हा त्रास सहन करत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र अलीकडे दुखण्याची तीव्रता वाढू लागल्याने डॉक्टरांकडे तपासणी केली असता शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान, संसद अधिवेशन सुरू असतानाच ही शस्त्रक्रिया करावी लागल्याचेही त्यांनी नमूद केले. अधिवेशनातील कामकाज, देशभरातील दौरे, तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची जबाबदारी या सगळ्यामुळे विश्रांती घेणे कठीण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही जवळ येत असल्याने या काळात विश्रांती घ्यावी लागणे अधिकच अवघड वाटत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. मात्र दुखापतीचा त्रास वाढत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोहोळ यांनी आपल्या समर्थकांना आणि नागरिकांना उद्देशून लिहिले आहे की, दुखापतीच्या वेदनेपेक्षा सध्या सुरू असलेल्या कामांपासून दूर राहावे लागणे अधिक त्रासदायक वाटत आहे. तरीही नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या बळावर आपण लवकर बरे होऊ आणि सुमारे 1 महिन्यानंतर पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कामाला सुरुवात करू, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.







