पुणे : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलीचा चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. शनिवारी (ता. 16) कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अजय तळेवाले (४५, रा. दत्तनगर, कात्रज) असे खून करणार्याचे नाव आहे. तर श्वेता तळेवाले (वय – ४०), शिरोली तळेवाले ( वय -१६) अशी खून झालेल्या आई आणि मुलीचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय तळेवाले हे फायनान्सची कामे करतो. गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळावेळी भांडण-तंटा होत होता. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्री देखील पती-पत्नीमध्ये वाद झाले. या भांडणामध्ये मी माहेरी निघून जाईल, असे रागात म्हणत श्वेता तळेवाले या झोपी गेल्या. त्यानंतर पतीने झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून तिचा खून केला.
दरम्यान, नेहमी आईची बाजू घेणार्या मुलीचा देखील अजयने तिच्या तोंडावर उशी दाबून खून केला. त्यानंतर स्वतः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.