Loni kalbhor : शहरात गुन्हेगारी वाढली की सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांवर टीका करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. मात्र, पोलिस कोणत्या बिकट परिस्थितीत काम करत आहेत, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. “स्मार्ट सिटी”च्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी पोलीस ठाण्यांना पुरेसे मनुष्यबळ द्यावे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून तब्बल 35 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर दोन पोलीस उपनिरीक्षक सेवेतून निवृत्त झाले आहेत. आधीच मर्यादित मनुष्यबळ असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यांमुळे पोलीस यंत्रणा ढासळण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अनेक पटींनी कामाचा ताण वाढला असून, जेमतेम मोजक्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जबाबदारी पडली आहे.
नव्याने केवळ एक-दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करून जागा भरल्याचा आभास निर्माण केला जात असला, तरी प्रत्यक्षात पोलीस ठाणे मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे. “सगळं सुरळीत आहे” असा दिखावा केला जात असला, तरी वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, वाहनचोरी, पाकीटमारी, हाणामाऱ्या, खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, महिलांवरील अत्याचार आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. याशिवाय ऑनलाइन व ऑफलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनीही डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहनचोरीचे प्रकार अक्षरशः रोजचे झाले आहेत.
या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या चौक्याही नावालाच उरल्या असल्याचे चित्र आहे. प्रत्येक चौकीत पुरेसे पोलीस नसल्याने गुन्हेगारीवर वचक ठेवणे कठीण झाले आहे. परिणामी, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असले, तरी उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दिवस-रात्र काम करूनही अपेक्षित परिणाम साधता येत नसल्याने पोलिसांची दमछाक होत आहे.
दरम्यान, सध्या सर्वसामान्य नागरिकांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे . लोणी काळभोर पोलीस ठाण्याला आवश्यक मनुष्यबळ कधी मिळणार? वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार? प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “स्मार्ट सिटी”च्या गप्पांपेक्षा प्रत्यक्षात मजबूत पोलीस यंत्रणा उभी करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.







