लोणी काळभोर : शेताच्या व ड्रेनेज लाईनच्या (Loni Kalbhor) वादातून एका कुटुंबाला (Pune News) तिघांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राममळा परिसरात रविवारी (ता.9) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हनुमंत रामचंद्र काळभोर, शुभम हनुमंत काळभोर (वय ३०), अक्षय हनुमंत काळभोर (वय 28, सर्व रा. सिद्राम मळा, रामदरारोड लोणी काळभोर, ता. हवेली,जि. पुणे) याप्रकरणी संदीप सिताराम काळभोर (वय 42, पत्ता-सिद्धाम मळा, रामदरा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप काळभोर हे एक शेतकरी असून कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. काळभोर हे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. फिर्यादी हे रविवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीने फोन करून सांगितले की, घराच्या पाठीमागे असलेल्या ड्रेनेज लाईन जवळ हनुमंत काळभोर हे आले आहेत व ते तुमचे भाऊ विकास यांच्यासोबत वाद करीत आहेत.
असे सांगितल्यानंतर संदीप काळभोर हे त्वरित घरी आले. तेव्हा फिर्यादी यांनी स्वखर्चाने तयार केलेली ड्रेनेज लाईन आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता फोडली होती व त्या लाईनला त्यांची ड्रेनेज लाईन जोडत होते. त्याबाबत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता, वरील तिन्ही आरोपींनी याचा व जुन्या शेताचा वाद म्हणत धरून संदीप काळभोर, त्यांचे भाऊ विकास, त्याची पत्नी सारीका व वडिल सिताराम काळभोर यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. ‘तसेच तुम्हाला बघुन घेतो व उभे कापतो, तुम्ही कसे शेतात जाता ते बघतो’ असे म्हणुन धमकी दिली.
याप्रकरणी संदीप काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ११८ (१).३५२, ३५१ (२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस जगदाळे करत आहेत.







