पुणे: शिवसेना शिंदे गटाचा पर्वती विभाग प्रमुख उद्धव ऊर्फ उद्धया लहु कांबळे याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात तो आरोपी असून, सध्या या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू आहे. मात्र, तो न्यायालयातील अनेक तारखांना गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने गंभीर दखल घेत त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

पोलीस कारवाई आणि अटक
न्यायालयाने जारी केलेले वॉरंट सहकारनगर पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू करण्यात आली. पोलीस हवालदार गणेश तळेकर, चंद्रकांत जाधव, अमोल मंडले आणि पद्माकर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी उद्धव कांबळे याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले.
राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
गंभीर गुन्ह्याचा आरोपी असलेल्या उद्धव कांबळे याची शिवसेना (शिंदे गट) पर्वती विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असून, अशा व्यक्तीला पक्षीय जबाबदारी देणे योग्य आहे का, आणि पक्ष यावर कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
\






