पुणे: राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांची (Local Bodies Election) तारीख जाहीर झाल्यानंतर (Shrirang Barane) उमेदवारांकडून (Ajit Pawar) अर्ज भरण्याची (Pune News) प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर पुढच्या महिन्यात राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकांचीही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोमात तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या आगामी निवडणुकीत एकत्र राहतील का? यावर चर्चा रंगत असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक राजकारण वेगळं चित्र दाखवत आहे. स्थानिक पातळीवरील नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवडमधील 32 प्रभागांतील 128 जागांवर स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमच्यासोबत युती करू इच्छित असेल तर आम्ही तयार आहोत; मात्र महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नाही, असं बारणे यांनी स्पष्टपणे सांगितले.
पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना, शिंदे गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र शरद पवारांचा गट अजित पवारांसोबत असेल, तर ही युती अशक्य असल्याचे श्रीरंग बारणे यांनी नमूद केले. महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत तडजोड न झाल्यास आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवू, असेही त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन स्वबळाचा संदेश दिल्याचे दिसून आले.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील पिंपरी चिंचवडमधील समीकरणे बदलू लागली आहेत. बारामतीप्रमाणेच पिंपरी चिंचवडही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्याचा प्रस्ताव अजित पवारांकडे पाठवला होता. परंतु या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याआधीच महाविकास आघाडीतल्या ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या गटासोबत आघाडी करायची नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनाही ही भूमिका कळवण्यात आली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, आणि महापालिका निवडणुकीतील आघाड्यांचे अंतिम चित्र कसे दिसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







