Indigo Flight Cancel: पुणे : पुणे शहरातील प्रवाशांसाठी अडचण निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीकडून विविध शहरांतील काही विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशी अडचणीत सापडले. आता पुणे विमानतळावरूनही काही महत्त्वाच्या इंडिगो विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. या सेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक आणि कार्यात्मक कारणांमुळे आगामी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते वाराणसी, पुणे ते बेंगळुरू, गुवाहाटी ते पुणे आणि पुणे ते चेन्नई या मार्गांवरील काही उड्डाणे या कालावधीत उपलब्ध असणार नाहीत. यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये वाराणसीहून पुण्याला येणारी इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 6884 आणि पुण्याहून वाराणसीला जाणारी फ्लाइट 6E 497 यांचा समावेश आहे. तसेच बेंगळुरूहून पुण्याला येणारी फ्लाइट 6E 6876 आणि पुण्याहून बेंगळुरूला जाणारी फ्लाइट 6E 6877 रद्द करण्यात आली आहे. याशिवाय गुवाहाटीहून पुण्याला येणारी फ्लाइट 6E 746 आणि पुण्याहून चेन्नईला जाणारी फ्लाइट 6E 918 देखील बंद ठेवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे ऐनवेळीस अनेकांच्या प्रवासाच्या योजना बदलण्याची वेळ आली आहे. काही प्रवाशांनी आधीच तिकिटांचे बुकिंग केले होते. अशा प्रवाशांना इंडिगो कंपनीकडून पर्यायी उड्डाणे किंवा परतावा दिला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र तरीही ऐन वर्षअखेरीच्या प्रवासाच्या काळात सेवा रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या फ्लाइटची स्थिती तपासून घ्यावी. अचानक होणाऱ्या बदलांमुळे गैरसोय होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.






