पुणे : शिरूर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नातीनेच तिच्या नवऱ्यासोबत मिळून आपल्या आजीचे पाच लाख रुपये चोरल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमल दत्तू मलगुंडे (वय ६०, रा. इंदिरानगर, शिरूर) असं तक्रारदारचं नाव आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटल आहे की, १० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता राजू दिनकर कोळपे व नात शिवानी राजू कोळपे (दोघे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) मी आजारी असल्याने मला भेटायला आले होते. मी अराम करत असताना घरातील कपाटातून ५ लाख रुपयांची रोकड चोरली आणि दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला नगरला उपचाराकरिता जायचे होते तेव्हा मी कपाट तपासले मात्र, रोकड गायब असल्याचे आढळले.
तक्रारदाराने आपल्या नातीला फोन करून पैशांबाबत विचारले असता तुझ्याकडे काय पुरावा आहे? असं म्हणत उडवाउडवीची उत्तर मिळाली. तसेच तुझ्याकडे आमचे आठ लाख रुपये आहेत. पुन्हा पैसे मागितलेस तर ठार मारू. अशी धमकी देण्यात आल्याचं तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला असून, नात आणि तिच्या नवऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच, त्यांच्या बँक खात्याच्या व्यवहारांचा तपशील देखील तपासला जात आहे.







