विशाल शिंदे

पुणे : भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर, निगडे याला महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम (नवी दिल्ली) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत 467.76 कोटी रुपयांचे कर्ज कारखान्यास उपलब्ध होणार असून, या कर्जाला राज्य शासनाने हमी दिली आहे.
या निधीतून कारखान्यात 3500 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा प्रकल्प, 60 के.एन.पी.डी. डिस्टलरी प्रकल्प, 12 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच 5 टन क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय कारखान्यास खेळते भांडवल उपलब्ध होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देणे, कामगारांचे वेतन तसेच दैनंदिन खर्च भागविणे सुलभ होणार आहे.
या निर्णयामुळे येत्या गाळप हंगामात स्थैर्य येणार असून शेतकरी व कामगार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. “राजगड साखर कारखान्याच्या उभारणीसाठी कर्जहमी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार,” अशी भावना सभासद, शेतकरी व कामगारांनी व्यक्त केली आहे. सहकार क्षेत्रासाठी हा निर्णय दिलासा देणारा असून ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि स्थानिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







