पुणे : कधी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता गुन्हेगारीच्या सावटाखाली अडकत चाललं आहे. विशेषतः आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि मुळशी परिसरात गुन्हेगारांचा छुपा वावर वाढला असून, दिवसेंदिवस गुन्ह्यांची प्रकरणं उघडकीस येत आहेत.

हिंजवडी परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे. या भागातील जमीन बळकावण्यासाठी धमकावणे, मारहाण, खून यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच कासारसाई परिसरात एका वकिलाने थेट शेतकऱ्यावर बंदूक रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कासारसाई (ता. मुळशी) येथील एका शेतकऱ्याची जमीन पाहणी करण्यासाठी अॅड. संदीप भोईर आपल्या काही साथीदारांसह या भागात गेले होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या टोळीचा विरोध करत त्यांना जागा सोडण्यास सांगितले. यावर संतप्त झालेल्या अॅड. संदीप भोईर यांनी थेट स्वतःच्या जवळ असलेली परवानाधारक बंदूक काढून शेतकऱ्यावर रोखली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने कारवाईस पुढे सरसावले असून, दोन्ही पक्षांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांनी माहिती देताना सांगितलं की, घटनेची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, हिंजवडी व मुळशी परिसरात जमिनीसाठी सुरू असलेल्या वादांमध्ये गुन्हेगारांची सक्रीय भूमिका दिसून येत आहे. आयटी कंपन्यांमध्ये कंत्राटं मिळवण्यासाठीही टोळक्यांकडून दबाव टाकण्याचे प्रकार घडत असून, कोयता घेऊन फिरणे, गाड्यांना आग लावणे, टोळक्यांची धडकी भरवणारी दहशत आणि शुल्लक कारणावरून जीव घेण्याचे प्रकार वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.







