संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या चोरट्यांची दौंड शहरामधील अत्यंत वर्दळीचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या शालिमार चौकामध्ये दोन तोतयांनी आपण क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून एका माजी सैनिकाचे तब्बल 2 लाख 75 हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हात चलाखी करून लुटून नेले.
याप्रकरणी के. जयचंद्रन (वय 70,रा. कोइम्बतुर, तामिळनाडू. सध्या रा. जनता कॉलनी, हिंदुस्तान चर्च समोर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी दुपारी 1.30 वा. सुमारास येथील शालिमार चौकामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस तेथे अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाचा एक इसम फिर्यादी यांना भेटून म्हणाला की, मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे, तुम्ही रेल्वेत नोकरीला होता ना. त्यावर फिर्यादी हो म्हणाले असता, तो म्हणाला की एक्सचेंज ऑफिसर मनोज शर्मा तुम्हाला माहित आहे का? मी चौकशी करत आहे तुम्ही येथून हलू नका, गोंधळ करू नका. त्यामुळे फिर्यादी शांतपणे थांबले.
दरम्यान, त्याने आणखी एका व्यक्तीला आवाज देऊन बोलाविले. ती व्यक्ती त्या ठिकाणी आली असता तो मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे, तुझे पाकीट दाखव. हातात अंगठी का घातली आहे, ती काढून तुझ्या रूमालात ठेव आणि तो रुमाल तुझ्याच खिशात ठेव. हे ऐकून त्या व्यक्तीने अंगठी रुमालात ठेवून ती खिशात ठेवली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना रुमाल काढण्यास सांगितले. परंतु फिर्यादी यांच्याकडे रुमाल नव्हता. त्यामुळे चोरट्याने स्वतःचा रुमाल त्यांना दिला व म्हणाला की तुमच्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन काढून रुमालात ठेवा.
फिर्यादी यांनी आपल्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन रुमालात ठेवून ती आपल्या खिशात ठेवली. नंतर ते दोघेही गडबडीने तेथून निघून गेले. त्यावेळी फिर्यादी यांच्या लक्षात आले की त्या दोन अज्ञात इसमांनी हातचलाखी करून त्यांचे 2 लाख 75 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.