पाटस, ता. 15 : चहाच्या टपरीच्या जागेवरून दोन कुटुंबात शिवीगाळ करून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. दौंड) टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता.6) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पॉस्को, ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा 6 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लक्ष्मी महादेव पवार (वय 36, रा. पाटस अंबीकानगर ता. दौड जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पार्वती उर्फ पासबाई देवराव भोसले व देवराव भोसले व त्यांचा मुलगा शुभम देवराय भोसले (सर्व रा. पाटस ता. दौड जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पार्वती देवराव भोसले (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मी महादेव पवार, महादेव पवार व एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, फिर्यादी लक्ष्मी पवार या पाटस टोलनाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला चहाचा स्टॉल लावुन चहा विक्री करीत होत्या. त्यावेळी पवार यांच्या शेजारी चहाचा स्टॉल असलेल्या पार्वती भोसले यांनी चहाचा स्टॉल बाजुला घे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. तर आरोपी शुभम भोसले याने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केला. व फिर्यादी यांच्या कपाळावर लोखंडी कोयता मारुन जखमी केले. त्यानंतर फिर्यादी चक्कर येवुन खाली कोसळल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, फिर्यादी पार्वती भोसले यांच्या चहाच्या स्टॉलजवळ लक्ष्मी पवार यांनी स्टॉल लावलेला होता. त्यावेळी फिर्यादी भोसले या पवार यांना तुझा स्टॉल थोडा पुढे घे. असा म्हणाल्या, परंतु, पवार यांनी स्टॉल पुढे घेणार नाही असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच पवार व एका अल्पवयीन मुलीने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडले. तर महादेव पवार याने जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला. पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करीत आहेत.
दरम्यान, यवत पोलीस ठाण्यात पॉस्को, ॲट्रॉसिटीसह विनयभंगाप्रकरणी 6 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडूनसुद्धा आज पाच दिवस उलटले आहेत. तरी अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.