तळेगाव : बोगस बँक खात्याद्वारे व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथून उघडकीस आली आहे. पी. पारसिक सहकारी बँक येथे 2016 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत ही फसवणूकीची घटना घडली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
गिरीश करंडे (वय 49 रा.तळेगाव दाभाडे) या व्यावसायिकाने फसवणूक झाल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुरुवारी (दि.15) रोजी त्यांनी ही फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी प्रतिक पाबळे (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीश करंडे यांना आरोपी पाबळे याने पी पारसिक सहकारी बँकेत त्यांच्या अधीराज लॅन्ड डेव्हलपर्स या कंपनीच्या नावाने खाते काढण्यास सांगितले. त्यानंतर पाबळे याने त्यांच्याशी बोलणे वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यावर, गिरीश करंडे यांनी 2016 साली त्यांचे खाते त्या बँकेत काढले. करंडेंनी त्यांच्या व्यवसायाचे पैसे त्या खात्यावर टाकले. मात्र ते खाते बोगस असून त्याद्वारे फिर्यादीचे तब्बल 55 लाख 3 हजार 367 रुपये लंपास केले हे समजताच फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.