BJP Pune : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध पक्षांच्या बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे बळ वाढले असले, तरी दुसरीकडे अंतर्गत नाराजीचा स्फोट झाला आहे. बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे मी वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली असून, पुण्यातील नाना पेठेतील भाजप कार्यालयासमोर नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. (BJP Pune)

मुंबईत पार पडलेल्या एका मोठ्या सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वॉटगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांचा समावेश आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधून ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह १५ हून अधिक दिग्गज नेत्यांनी कमळ हाती घेतले आहे.
एकीकडे पक्षविस्ताराचा आनंद साजरा होत असतानाच, पुण्यात मात्र चित्र वेगळे दिसले. “बाहेरून येणाऱ्यांना रेड कार्पेट आणि निष्ठवंतांना घरचा रस्ता दाखवला जात आहे का?” असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. या पक्षप्रवेशांमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील महापालिकेच्या आगामी समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पक्षश्रेष्ठींनी या ‘बंडाची’ गांभीर्याने दखल घ्यावी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही नाराजी भाजप कशी शमवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







