सागर जगदाळे
भिगवण : प्रतिनिधी दि.25
Bhigwan : उजनी धरणाच्या इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन बुधवारी (दि. 25) दिले.
या भेटीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी संदर्भात चर्चा केली. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील 81 गावांनी त्याग केलेला आहे. शेतकऱ्यांनी नाममात्र किंमतीमध्ये शासनास हजारो शेतक-यांची मालमत्ता दिली आहे. शेतकऱ्यांनी हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अद्यापी योग्य असे पुनर्वसनही झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त गावे नागरी सुविधा पासून वंचित आहेत. उजनी धरणासाठी आपली सर्वस्व त्याग करणा-या धरणग्रस्तांवर जलसंपदा विभागामार्फत शासन निर्णय.

दि. 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोंबर 2025 या निर्णयानुसार धरण क्षेत्र नजिकच्या अतिरिक्त जमिनी पी.पी.पी. (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) 49 वर्ष करारावर देण्याचे दिसत आहे. या शासन निर्णयास धरणग्रस्ताचा तीव्र विरोध दिसून येत आहे. शेतकरी पूर्वीपासून आजपर्यंत ज्या जमिनी संपादित आहेत, परंतु धरणाचे पाणी क्षेत्रामध्ये येत नाही. अशा जमिनीमध्ये पाणीपातळी कमी झाल्यानंतर गाळपेरमध्ये जनावरांना चारा पिके घेत असलेल्या जमिनी काढून घेण्यास धरणग्रस्तांचा तिव्र विरोध आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीचा शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक एल.क्यु. एन. 347/ एच. दि. 10 ऑक्टोंबर 1973 व दि. 19 ऑक्टोंबर 1974 या निर्णयाने संपादित केलेली परंतु त्या कामासाठी लागत नसलेली जमिन ही मुळ मालकांना परत किंवा भाडे करारावर दयावी असे धोरण आहे. मात्र मुळ शासन निर्णयानुसार नवीन शासन निर्णयामध्ये विसंगती स्पटपणे दिसून येत आहे. तरी सदर जमिन मुळ मालकांना परत देण्यासंदर्भात योग्य निर्णय व्हावा, अशी मागणीही या निवेदनामध्ये दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीत नमूद केले.
पुण्यात विखे पाटलांबरोबर लवकरच बैठक!
या भेटीत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील व यांनी पुणे येथे उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व काही शेतकऱ्यांसमवेत तुंम्ही वेळ देऊन बैठक आयोजित करावी, अशी विनंती ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. त्यानुसार पुणे येथे या संदर्भात लवकरच संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.






