पुणे: राज्यातल्या आगामी स्थानिक (Bawankule On Upcoming Election) स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies Election) निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक घेतली आणि या बैठकीत भाजपच्या उमेदवारीबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले ” महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं स्पष्ट सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणातून सर्व अंदाज घेऊन आम्ही उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असली तरीही, ज्याला जनतेच्या मनात स्थान आहे, नगरसेवक म्हणून ज्याला जनतेची मान्यता आहे आम्ही अशाच उमेदवारांची निवड करणार आहोत”

यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना आगामी निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त करतांना बावनकुळे म्हणाले ” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती ५१ टक्क्यांच्या वर मतं घेऊन येणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, शंभुराजे देसाई यांच्यासह आम्ही समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. स्थानिक परिस्थीमुळे वेगळे लढण्याची वेळ आली तर महायुतीमध्ये वाद होणार नाहीत, वितुष्ठ येणार नाही, मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला.
दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर बोलतांना ते म्हणाले ” या निवडणुका स्थानिक पातळीवरील आहेत. त्यामुळे काही ठिकाणी भाजप – राष्ट्रवादी, काही ठिकाणी भाजप – शिवसेना अशी लढत होऊ शकते. अशा वेळी राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणाला सोबत घेऊन लढायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, ज्या ठिकाणी आमच्या समोर घड्याळ किंवा धनुष्यबाण चिन्ह असेल तेथे आम्ही मनभेद होणार नाही, याची काळजी घेवू, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.







