पुणे, ता. 17 : जेष्ठ नागरिकाचे बनावट मृत्युपत्र तयार करून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती अॅड. अमेय बलकवडे यांनी दिली आहे.

गौरव मोतीलाल कोल्हापुरे असे अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नानासाहेब लक्ष्मण वाळवेकर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात गौरव कोल्हापुरेसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब वाळवेकर व कै. बाळासाहेब वाळवेकर हे दोघे भाऊ आहेत. त्यांची खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्ता आहे. तर गौरव कोल्हापुरे व त्याच्या सहकाऱ्यांनी संगणकाद्वारे खोटे मृत्युपत्र तयार केले व त्यावर कै. बाळासाहेब लक्ष्मण वाळवेकर यांची बनावट सही केली, आणि ते मृत्युपत्र न्यायालयात सादर केले होते. असा आरोपींनी कट रचला होता. याप्रकरणी नानासाहेब वाळवेकर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार पाचही आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधायक कलम 420, 465, 467, 471, 472 व कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हाचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या कागदपत्रांची पडताळणी केली असता, न्यायालयात जोडलेल्या मृत्युपत्रासोबतचे फिटनेस प्रमाणपत्र खोटे आहे. तसेच त्यावरील डॉक्टरांची सही आणि शिक्का बनावट तयार करुन वापरण्यात आल्याचे तपासात निष्पण झाले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी गौरव कोल्हापुरे याने अटकेपासून संरक्षणासाठी अॅड. अमेय बलकवडे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. खडक पोलीस ठाण्यातील गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असुन, आरोपीस खोट्या गुन्हात गोवण्यात आले आहे. हा गुन्हा दाखल होताना ३ वर्षाचा उशीर झाला असुन त्याचे कारण फिर्यादीकडून देण्यात आलेले नाही. आरोपीवरती यापुर्वी कोणताही गुन्हा नसुन आरोपी तपासास सहकार्य करण्यात तयार आहे. असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. अमेय बलकवडे यांनी केला.
दरम्यान, अॅड. अमेय बलकवडे यांनी केलेले युक्रिवाद ग्राह्य धरून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश आर. एन. हिवसे यांनी आरोपीचा सशर्थ अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला आहे. या खटल्यात आरोपीच्या वतीने अॅड अमेय बलकवडे, अॅड मयूर मराठे, अॅड ओंकार जगताप, अॅड वैभव हाटकर, अॅड ललित उतमानी यांनी कामकाज पाहिले.







