संतोष पवार:

पळसदेव (पुणे): एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत इंदापूर प्रकल्प दोन बीट भिगवण अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्यांचा एकत्रित आरंभ पालक मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसदेव ता इंदापूर येथे आयोजित कऱण्यात आला होता. या आरंभ मेळाव्याचे उद्घाटन इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले. प्रतिमा पूजन इंदापूर बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, पळसदेवचे सरपंच अंकुश जाधव आदिंसह उपस्थित पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की राष्ट्रीय पोषण अभियान २०२५ अंतर्गत राबवण्यात येणारे अशा प्रकारचे आरंभ पालक मेळावे महत्वाचे असुन पालक कुटुंब व समुदायाचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रमांची आवश्यकता आहे. ० ते ३ वर्ष बालकांचा सर्वांगीण विकास ही काळाची गरज आहे. त्याकरिता राबविण्यात येणारे खेळ कृती व प्रेमाचा स्पर्श आदि विधायक कार्यक्रम उपयुक्त ठरत आहेत.त्याकरिता ० ते ३ वर्षापर्यंत बालकांचा विकास कशा प्रकारे करावा याविषयी पालकांना माहिती देण्याकरिता विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या उपक्रमाची उत्कृष्ठ तयारी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका तांबोळी मॅडम यांनी केले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ व पळसदेवचे सरपंच अंकुश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता बनसुडे व सुनंदा पोंदकुले यांनी स्वागतगीत तर माळेवाडी येथील अंगणवाडीतील मुलींनी सुंदर गीत सादर केले. बेटी बचाव बेटी पढाओ असा संदेश यावेळी देण्यात आला .
यावेळी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शाळेने विशेष सहकार्य केल्याबद्दल बापु आदलिंग यांचा सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका , मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी इंदापूर गटविकास अधिकारी सचिन खुडे ,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ ,विलास बंडगर, रोहीत निकत, पळसदेवचे उपसरपंच कैलास भोसले, सदस्य अजिनाथ पवार, मेघराज कुचेकर , महेंद्र काळे, विकास शिंदे, शहा भाभी, भुजबळ मॅडम आदिंसह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले. आभार बापू आदलिंग यांनी मानले.







