Manikrao Kokate : शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या जुन्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी चक्रं फिरवली आहेत. कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांना रुग्णालयातूनच ताब्यात घेतले जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Manikrao Kokate)

पोलीस आयुक्तांकडून तातडीचा अहवाल तलब
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागवली आहे. कोकाटे यांच्यावर सध्या सुरू असलेले उपचार, त्यांची प्रत्यक्ष वैद्यकीय स्थिती आणि डॉक्टरांचा अहवाल यांची सखोल पडताळणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोकाटे यांना रुग्णालयातूनच अटक करण्याबाबतचा अंतिम निर्णय नाशिक पोलीस घेणार आहेत. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला आहे.
विजय कोकाटेंचा शोध सुरू
या फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांनाही सहआरोपी म्हणून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वॉरंट काढले असून, सध्या ते फरार असल्याचे समजते. विजय कोकाटे यांचे नेमके लोकेशन शोधण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून त्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. कोकाटे बंधूंनी १९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासकीय सदनिका मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काय आहे १९९५ चं प्रकरण?
१९९५ साली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय मालमत्ता हडपल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर करण्यात आला होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती, मात्र जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने त्यांना आता कारागृहाची हवा खावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकाटे यांच्या आजारपणामुळे अटकेची कारवाई लांबणीवर पडली असली तरी पोलीस आता कोणत्याही क्षणी कारवाईच्या तयारीत आहेत.





