Hingoli : सध्या राज्यात निवडणुकीचा माहोल तापलेला असताना हिंगोलीतून एक धडकी भरवणारी बातमी समोर आलीये. राज्यात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू ठेवलेत. एकीकडे हा निवडणुकीचा गडबडगोंधळ, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिस यांची कडक नजर पैशांच्या देवाणघेवाणीवरही काटेकोर लक्ष ठेवण्यात येतंय. (Hingoli)

अशातच हिंगोली शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. शहरातील मंगळवारा भागातील शेतकरी भवन परिसरातून ही रोकड एका चारचाकी गाडीत सापडल्याचं समोर आलंय. पैशांची इतकी मोठी बॅग कारमधून सापडताच परिसरात चांगलाच खळबळ उडाला. ही रक्कम कोणाची? कुठून आली? आणि कुठे जाणार होती? याबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी रोकड आढळताच तात्काळ निवडणूक विभागाला कळवलं आणि त्यानंतर भरारी पथकानं ही रक्कम आपल्या ताब्यात घेतली. आता संपूर्ण पैशांसंबंधी कागदपत्रांची आणि व्यवहाराची कसून पडताळणी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे चर्चांना उधाण आलं असून प्रशासनाची धावपळही वाढली आहे.







