Donald Trump : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (Iran Israel War) सध्या संपूर्ण जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या युद्धामुळे भारतालाही ऊर्जा टंचाईचा सामना करावा लागत असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद केल्यामुळे तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला होता. पुढील 48 तासांच्या आत होर्मुझचा जलमार्ग खुला न केल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ला करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेत मोठा बदल केला असून आगामी 5 दिवस इराणवर कोणताही हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिका इराणला घाबरली की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या 2 दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला वाव मिळावा म्हणून त्यांनी आपल्या लष्कराला पुढील 5 दिवस इराणच्या कोणत्याही ऊर्जा केंद्रावर किंवा प्रकल्पावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. या घोषणेमुळे तूर्तास तरी युद्धाचा धोका टळल्याचे दिसत आहे. जर या 5 दिवसांच्या काळात दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली, तर भविष्यात हे युद्ध कायमचे थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने दिलेल्या 48 तासांच्या इशाऱ्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले होते. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही, अशी भूमिका इराणने मांडली होती. जर अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण पर्शियन आखात बंद करून तिथे सुरुंग पेरले जातील, असा थेट इशारा इराणने दिला होता. तसेच, जे देश या युद्धात सामील नाहीत, त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी इराणशी चर्चा करावी लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले होते. या तणावाच्या परिस्थितीत आता अमेरिका आणि इराणमधील चर्चेतून काय साध्य होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
पुढील 5 दिवसांत होणाऱ्या या घडामोडी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि शांततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. इराण आणि अमेरिका आपापल्या भूमिकेवर ठाम राहतात की चर्चेतून सुवर्णमध्य काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.







