Crime News: ग्वाल्हेर : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 19 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास डबरा परिसरात घडली. पीडित तरुणी एका स्थानिक स्टॉलवर स्नॅक्स खाण्यासाठी गेली होती. त्यावेळी ई-रिक्षातून आलेल्या दोन जणांनी तिला वाटेत अडवले. आरोपींनी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवले आणि तिला घेऊन गेले.
यानंतर आरोपींनी वाटेत आणखी एका साथीदाराला सोबत घेतले. तिघांनी मिळून पीडितेला एका कॉलेज कॅम्पसमधील निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकावून तेथून पळ काढला.
या घटनेनंतर पीडित तरुणी भीतीमुळे काही दिवस गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी तिची तब्येत खालावल्याने तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शुक्रवारी उशिरा रात्री तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेनंतर संबंधित कॉलेजमधील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






