Crime News: नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आऊटर नॉर्थ भागातील चंदन नगर परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 3 लहान मुलांची हत्या (Murder) केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पती सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, घरामध्ये 4 जणांचे मृतदेह आढळले. सर्वांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. घरात झटापटीच्या खुणा सापडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब साधे आणि शांत स्वभावाचे होते. त्यामुळे अशी घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे. हत्येमागील कारण काय असावे याचा तपास सुरू आहे.

हत्या करून आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षा वाढवून संपूर्ण घर सील करण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून चारही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपासासाठी पोस्टमार्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे. आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील तसेच जवळच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्याच्या हालचालींबाबत माहिती गोळा केली जात आहे.







