मुंबई: रेल्वे प्रवासात (Vande Bharat Express) हरवलेली वस्तू परत मिळणे म्हणजे ‘दुर्मिळ’ योग मानला जातो, पण शिर्डी रेल्वे स्थानकावर एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने घाईघाईत कँटीनमध्ये ३ लाख रुपयांची रोकड असलेली पर्स विसरलेल्या एका महिला प्रवाशाला, रेल्वे सुटण्यापूर्वीच तिचे पैसे सुखरूप परत तिला दिले. शिर्डीचे उपस्थानक व्यवस्थापक अनिल तायडे यांच्या या तत्परतेमुळे रेल्वे प्रशासनाची मान उंचावली आहे.

शिर्डीचे दर्शन घेऊन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने परतण्यासाठी मुंबईच्या रहिवासी प्रिया पाटील या बुधवारी (१४ जानेवारी) स्थानकावर पोहोचल्या होत्या. दरम्यान, ‘जन आहार’ कँटीनमध्ये नाश्ता करत असतांना गाडी सुटण्याची अनाउन्समेंट झाली आणि घाईघाईत त्या त्यांची पर्स टेबलवरच विसरून रेल्वेत जाऊन बसल्या.
कँटीन कर्मचाऱ्याने टेबलवर बेवारस पर्स पडलेली पाहताच ती अनिल तायडे यांच्या स्वाधीन केली. तायडे यांनी विलंब न लावता तातडीने स्थानकावर उद्घोषणा केली, परंतु गाडी सुटण्याची वेळ झाल्याने कोणीही समोर आले नाही.पर्समधील एका कागदपत्रावर मोबाईल क्रमांक मिळाला. तायडे यांनी त्वरित संपर्क साधला आणि धावत जाऊन प्रिया पाटील यांची खात्री पटवून ती पर्स त्यांच्या स्वाधीन केली.







