मुंबई: शिवसेनेच्या नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी (दि. ७) न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याची विनंती ठाकरे गटाने केली. या संदर्भातील वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे.
आगामी चार आठवड्यांच्या आत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. परंतु, न्यायालयीन सुट्ट्यांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी करणे शक्य नसल्याचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर, कपिल सिब्बल यांनी विनंतीला जोर देऊन न्यायालयीन निकालाशिवाय हा निर्णय इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसल्याचे म्हटले आहे.