Mumbai Crime: मुंबईतील चेंबूर परिसरात लष्कराच्या निवृत्त जवानाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्याचे रुग्णालयातील तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 59 वर्षीय निवृत्त जवानाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत चेंबूर परिसरात राहते. तिच्या राहत्या इमारतीतच हा निवृत्त जवान देखील वास्तव्यास होता. पीडित मुलगी त्याला काका म्हणून संबोधत असे. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर पीडित मुलगी सतत पोटदुखीची तक्रार करत होती. त्यामुळे तिच्या आईने तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर संतप्त झालेल्या आईने चेंबूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, आरोपीने पीडित मुलीवर केवळ अत्याचारच केले नाहीत, तर तिला धमक्या देऊन गप्प बसवण्याचाही प्रयत्न केला. मुलगी भयभीत झाल्याने तिने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र, तब्येत बिघडल्याने अखेर हा प्रकार उघड झाला.
चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या जवानाला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.







