मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) हिंगोली येथे केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवजयंती निमित्त कामठा (Maratha Arrakshan) फाटा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी “माझ्या विरोधात मोठा कट रचला जातोय” असा गंभीर आरोप केला. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

जरांगे पाटील म्हणाले की, पुढील 4 ते 5 दिवसांत मुंबईत मोठा कट आखला जात असून त्यात एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. मात्र “आपणही काही कमी नाही, आपलीही यंत्रणा कामाला लागली आहे” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
“मी गरिबांच्या लेकरांसाठी काम करतो, त्यामुळेच मला लक्ष्य केले जात आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तथापि, या दाव्यांबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्येही उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर जरांगे पाटील यांची राजकीय सक्रियता वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले आरोप आगामी राजकीय घडामोडींना नवे वळण देऊ शकतात.
दरम्यान, राज्य प्रशासन किंवा संबंधित विभागांकडून या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांत जरांगे पाटील या संदर्भात अधिक माहिती उघड करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







