मुंबई: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या (Local Bodies Election) निवडणुकांसाठी प्रचाराची (Ajit Pawar) जोरदार धावपळ सुरू असताना (Eknath Shinde) मतदानाला काही तास उरले असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान प्रलोभने देणाऱ्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे.

अशा प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या सुमारे 20 नेत्यांविरोधात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवण्यात आला आहे. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल. 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही नवीन योजना, घोषणा किंवा मतदारांना प्रलोभने देणे नियमबाह्य आहे.
मात्र प्रचारादरम्यान काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आयोगाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे आणि चित्रा वाघ यांच्यासह इतर काही नेत्यांनी प्रलोभनात्मक वक्तव्ये केली असून त्याचा तपास सुरू आहे.
अजित पवार यांनी सर्व अठरा उमेदवार विजयी झाले तर 1400 कोटी रुपयांचा निधी देण्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी मतांमध्ये काठ पडल्यास निधीही कमी होईल असेही म्हटल्याचे आरोप आहेत. गुलाबराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होईल असे विधान केले होते. एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्यांबाबत उल्लेख केला होता, तर चित्रा वाघ यांनी मतदारांना कमळाच्या बटणाकडे वळवणारे वक्तव्य केले होते.
निवडणूक आयोगाने या सर्व वक्तव्यांची तपशीलवार नोंद घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. काही नेत्यांचे वक्तव्य नियमभंगात मोडत असल्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता वाढली आहे. राज्यातील प्रचाराचा ताप वाढत असतानाच आयोगाच्या या हस्तक्षेपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.







