मुंबई: महाराष्ट्र (EVM Candidate Sequence) राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मतदान यंत्रावर म्हणजे ईव्हीएमवर उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलण्यात येणार आहे. आतापर्यंत बॅलेट पेपर किंवा ईव्हीएमवर उमेदवारांची नावे ही मराठी वर्णमालेनुसार त्यांच्या आडनावाच्या क्रमाने लावली जात होती. मात्र नव्या नियमामुळे आता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. मतदारांचा गोंधळ कमी व्हावा आणि त्यांना आपल्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार सहज सापडावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले असून महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील विविध कलमांचा वापर करून हे नियम लागू केले आहेत. नव्या पद्धतीनुसार उमेदवारांची विभागणी ४ गटांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या गटामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील अधिकृत राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार असतील. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये इतर राज्यांतील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार असतील ज्यांनी महाराष्ट्रात नोंदणी केली आहे. तिसऱ्या गटात नोंदणीकृत असलेल्या पण अमान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचा समावेश असेल आणि सर्वात शेवटी चौथ्या गटात अपक्ष उमेदवारांची नावे दिसतील.
प्रत्येक गटातील उमेदवारांचा अंतर्गत क्रम लावताना मात्र मराठी वर्णमालेचाच आधार घेतला जाईल. यात प्रथम आडनाव आणि त्यानंतर नाव यानुसार क्रम लावला जाईल. यापूर्वी आडनावामुळे दिग्गज पक्षांच्या उमेदवारांची नावे यादीत खाली जात असत. आता मात्र मान्यताप्राप्त पक्षांना सुरुवातीलाच स्थान मिळणार आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्व लक्ष जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागले आहे. अशा वेळी हा नवा नियम उमेदवारांसाठी आणि मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मतदारांना आता आपला पक्षीय उमेदवार ईव्हीएमवर शोधणे अधिक सोपे जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.






