मुंबई: मुंबईमध्ये एका (Crime News) दिव्यांग महिलेसोबत पोलिस कर्मचाऱ्याने (Mumbai Crime) अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गार्डनमध्ये एकटी (Mumbai News) बसलेल्या या महिलेला पाहून संबंधित पोलिस तिच्याजवळ गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागल्याचा आरोप आहे. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त जमावाने त्या पोलिसाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास मुंबई शहरातील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात घडली. भाऊसाहेब हिरे गार्डन येथे एक दिव्यांग महिला बसलेली असताना गणवेशातील एक पोलिस कर्मचारी तिच्याजवळ आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या पोलिसाने महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
गार्डनमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच मोठ्या संख्येने गर्दी केली. नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित पोलिसाला रोखले आणि संतापाच्या भरात त्याला मारहाण केली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेला सहाय्यक उपनिरीक्षक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित पोलिस कर्मचारी सशस्त्र पोलिस दलाशी संलग्न असून सध्या एल विभाग-2 येथे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही घटना ज्या गार्डनमध्ये घडली, त्या ठिकाणाजवळच पोलीस ठाणे आहे. या गार्डनमध्ये दररोज नागरिक फिरण्यासाठी तसेच लहान मुले खेळण्यासाठी येतात. दिव्यांग महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे ताडदेव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







