Crime News: मुंबई : गोवंडी परिसरात 19 वर्षांच्या तरुणीच्या हत्येची (Murder) घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शिफा शेख असे मृत तरुणीचे नाव असून तिच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक (Arrest) केली आहे. साजिद शेख, कलाम चौधरी, रिझवान शेख उर्फ नदीम आणि तबस्सूम शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक न्यायालयाने सर्व आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना 10 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता घडली. शिफा शेख घराबाहेर न्याहारीसाठी गेली असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला. जखमी अवस्थेत तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. तिच्या गालावर गोळी लागल्याचे आढळले.
प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. नदीम आणि तबस्सूम यांच्यात संबंध होते. शिफा आणि नदीम यांच्यातील जवळीक पाहून तबस्सूमला संशय आला होता. त्यातूनच शिफाची हत्या करण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपासात असेही समोर आले की गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल नदीमने उपलब्ध करून दिले होते. या घटनेत साजिद आणि कलाम यांनी मदत केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







