मुंबई : अभिनय क्षेत्रात पुन्हा नव्याने काम करण्याची तयारी सुरू असतानाच टेलिव्हिजन अभिनेता अनुज ठाकूर याच्या आयुष्याचा अनपेक्षित शेवट झाला. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याचं निधन झाल्याने टीव्ही मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनुज ठाकूरने ‘बंधन सात जनमों का’, ‘धूम मचायो धूम’, ‘बींद बनूंगा घोडी चढूंगा’ आणि ‘महिसागर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. या भूमिकांमुळे त्याने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली होती. अभिनय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्यासाठी तो प्रयत्न करत होता.
अनुजचा जवळचा मित्र रूपेश सोनार याने त्याच्या निधनाबाबत माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, 30 ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असतानाच अनुजचा मृत्यू झाला. अनुज नेहमीच फिटनेसबाबत जागरूक असायचा. दररोज पहाटे 4:30 वाजता उठून जॉगिंग आणि व्यायाम करणे हा त्याचा दिनक्रम होता.

मात्र, घटनेच्या दिवशी त्याचा अलार्म वाजूनही तो उठला नाही. त्यानंतर आई त्याला जागे करण्यासाठी गेली असता तो प्रतिसाद देत नव्हता. त्याचा श्वास थांबल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

रूपेशने सांगितले की, निधनाच्या साधारण 10 दिवस आधीच त्याची अनुजशी भेट झाली होती. त्यावेळी तो आनंदी होता आणि नव्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या विचारात होता. दोघांनी भविष्यात एकत्र काम करण्याचेही नियोजन केले होते.
रूपेश आणि अनुजची ओळख 2000 मध्ये ‘बंधन सात जनमों का’ मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले. अनुजला तो लहान भावाप्रमाणे मानत होता. त्याच्या अचानक जाण्याने अनेक आठवणी आणि अपूर्ण स्वप्ने मागे राहिली आहेत.






