मध्य प्रदेशातील इंदूर येथील निवृत्त न्यायाधीश रमेश गर्ग यांच्या घरी १० ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३:३० वाजता चोरट्यांनी दरोडा टाकला. मास्क घातलेल्या तीन चोरांनी विजय नगर परिसरातील त्यांच्या बंगल्यात प्रवेश करून ५ लाख रुपये रोख आणि दागिने चोरून नेले. या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इतका भयान आहे की, पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

नेमकं काय घडलं?
चोरट्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून निवृत्त न्यायाधीशांच्या बंगल्यात प्रवेश केला. न्या. गर्ग यांचा मुलगा ऋत्विक गाढ झोपेत असताना चोर त्याच्या खोलीत शिरले. एका चोराने कपाट उघडून चोरी केली, तर दुसरा चोर हातात लोखंडी रॉड घेऊन ऋत्विकजवळ उभा होता. घरातील अलार्म सिस्टिम वाजली, तरीही चोरांनी ४ मिनिटे १० सेकंदात चोरी पूर्ण करून पळ काढला. जर ऋत्विक जागा झाला असता, तर त्याच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता होती. सुदैवाने तो झोपेतून न उठल्याने थोडक्यात बचावला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षक असतानाही चोरांनी लोखंडी गेट तोडून प्रवेश केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या व्हिडिओवर नेटकरी अनेक कमेंट करत आहेत.






