पुणे : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला. ही परीक्षा २९ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आली होती. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०२२ चा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान दिला आहे. या कालावधीमध्ये उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही मुख्य परीक्षा अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या सहा केंद्रांवर २१, २२ आणि २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कटऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे ४ तारखेला निकाल जाहीर झाला आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असे एमपीएससीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते.





