अमित मुंडीक

पुणे: पुणे (Pune News) शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून, सतत गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असलेला अमन इब्राहिम खान (वय 23, रा. सत्तार खान चाळ, नाना पेठ) याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अमन खान याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नागरिकांची सुरक्षा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात रवानगी केलेली ही सहावी मोठी कारवाई ठरली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यश
ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे आणि समर्थ पोलीस स्टेशनच्या पथकाने अथक प्रयत्नांनी ही कारवाई यशस्वी केली. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या या कडक भूमिकेमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







