प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : दिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरात प्रवेश करत ७ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. २५७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (१), ३३१ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या आदेशानुसार समर्थ पोलीस स्टेशनचे तपास पथक व गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुनिल मल्हारी तलवारे (वय ३८, रा. आकुर्डी, पुणे) व एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले दागिने विक्रीसाठी शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा (वय ४०, रा. चिखली, पुणे) याच्याकडे दिल्याची माहिती दिली.
त्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरातून शिवानंद मोची याला अटक करून आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा एकूण ८,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी खराडी, चंदनगर पोलीस स्टेशन तसेच महाड शहर (जि. रायगड) हद्दीतही घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१ श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सौ. अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन श्री. उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, वाहन चोरी व दरोडा पथक-२ मधील सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तसेच अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






