Pune News: पुणे : पुणे शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी पण दिलासादायक बातमी समोर आली आहे. खेळता खेळता पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत असलेले घातक ॲसिटिक ॲसिड पिल्याने सातारा जिल्ह्यातील अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. मात्र पुण्यातील डॉक्टरांच्या वेळेवर आणि अथक प्रयत्नांमुळे या बालकाला नवजीवन मिळाले आहे. बालदिनाच्या दिवशी घडलेली ही घटना सर्वांनाच हादरवणारी ठरली होती. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा- Loni Kalbhor: लोणी काळभोर परिसरातून 16 वर्षाच्या मुलीचे अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालकाच्या घरात साफसफाईसाठी वापरण्यात येणारे ॲसिटिक ॲसिड पाण्याच्या बाटलीत ठेवण्यात आले होते. खेळताना चुकून त्या बाटलीतून मुलाने हे द्रव प्राशन केले. काही क्षणांतच मुलाच्या तोंडातून रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याच्या ओठांना, तोंडाला, अन्ननलिकेला आणि छातीसह शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर भाजल्या गेल्या. श्वास घेण्यास अडथळा येऊ लागल्याने आणि तीव्र वेदनांमुळे त्याची अवस्था गंभीर बनली होती.
सुरुवातीला साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक विशेष रुग्णवाहिकेद्वारे साताऱ्यात पोहोचले. तेथून बालकाला तातडीने पुण्यात हलवण्यात आले.
पुण्यात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर मुलाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. श्वसनाचा त्रास कमी झाला आणि वेदनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अखेर मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या चिमुकल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.





